जेव्हा परळी व केज मध्ये आमचे आमदार होतील, त्यावेळी व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन !

परळी आणि केज मतदारसंघात जोपर्यंत आमचे आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत फेटा बांधणार नाही. जेव्हा आमदार होतील, त्यावेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन, असा निर्धार शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. आंबेजोगाईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते.

Loading...

विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु होताच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरु आहे. एकीकडे राजकीय पळवापळवी सुरु आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सर्व पक्षांनी यात्रांचा धडाका लावला आहे.

तरुणांच्या तोंडाला पानं पुसून पदवीबरोबरच बेरोजगारीचे सर्टिफिकीट देणाऱ्या शासनकर्त्यांच्या चाली वेळीच ओळखा. मराठवाड्यातील युवा म्हणजे धगधगता अंगार आहे. या तरुणाईला सावध करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आहे, अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हेंनी तरुणांना जागं होण्यास सांगितलं.

विधानसभेसाठी परळी मतदारसंघात भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची लढत त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. पंकजा मुंडे 2009 पासून परळीत आमदार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात होणारी लढत अटीतटीची ठरणार आहे.

धनंजय मुंडे जोपर्यंत पंकजा मुंडे यांना पराभूत करुन आमदारकी मिळवत नाहीत, तोपर्यंत डॉ. अमोल कोल्हे फेटा बांधणार नाहीत, असंच दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आणि आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवस्वराज्य यात्रा काढत आहे.

लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...