खैरेंनी इम्तियाज जलील यांच्याशी हस्तांदोलन टाळले !

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे विद्यमान खासदार यांच्यात वितुष्ट आले आहे. या आधी उद्योजकांच्या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसण्यास नकार दिलेल्या चंद्रकांत खैरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑरिक सिटीच्या कार्यक्रर्मात इम्तियाज यांच्यांशी हस्तांदोलन टाळले.

Loading...

ऑरिक सिटी हॉल व राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्याच्या उद्धाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज औरंगाबादेत होते. या कार्यक्रमासाठी शिवसेना-भाजपचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याचे सांगत इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान मोदी यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. मात्र नंतर ऑरिक सिटी हॉलच्या लोकर्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

व्हीआयपी कक्षात नेते, खासदार, आमदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे आमदार संजय शिरसाट, अंबादास दानवे यांच्या सोबत आले होते. पहिल्या रांगेत ते भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्या बाजूला बसले होते. त्यानंतर काही वेळाने खासदार इम्तियाज जलील कार्यक्रमस्थळी आले.पहिल्या रांगेत बसलेल्या नेत्यांशी हस्तांदोलन करत ते पुढे जात असतांना त्यांचे लक्ष खैरे यांच्याकडे गेले. इम्तियाज यांनी हस्तांदोलनासाठी त्यांच्यापुढे हात केला, पण फोन आल्याचे भासवत खैरे यांनी हस्तांदोलन टाळले.

त्यानंतर बोराळकर यांच्याशी हस्तांदोलन करत इम्तियाज जलील खैरे यांच्यापासून तीन चार आसन सोडून राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटले यांच्या शेजारी जाऊन बसले.प्रसारमाध्यमांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी बराच वेळ या दोन्ही नेत्यांवर आपले कॅमेरे रोखून धरत त्यांना एकमेकांची भेट घेण्याची विनंती केली. पण खैरे यांनी याला नम्र नकार देत ‘मी त्यांच्या गुरू आहे’ असे म्हणत हा विषय टोलवला. तर हो खैरे माझे गुरूच आहेत असे सांगत इम्तियाज यांनी देखील त्यावर कोटी केली. बराच वेळ हा प्रकार सुरू असल्याने तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये पुन्हा एकदा खैरे-इम्तियाज यांच्यातील एकमेकांना टाळण्याच्या विषयावर चर्चा रंगली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...